आकाशात वीज चमकत असताना नागरिकांनो सावधान;या गोष्टी करू नका
बीड, दि. 19 (जि.मा.का.) हंगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध भागात वीज चमकण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. वीज कोसळणे ही एक गंभीर नैसर्गिक आपत्ती असून नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना खालील खबरदारीचे उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वीज चमकत असल्यास घ्यावयाच्या खबरदारी:
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करू नका
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॅावरखाली आंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका.तसेच कुठल्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या साह्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडांच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारात अथवा खिडकीतून वीज पडताना बाहेर पाहू नका व बाहेर थांबणे तितकेच धोकादायक आहे.
उपयोगी मोबाईल ॲप्सची माहिती,
दामिनी ॲप – हे ॲप भारतीय हवामान विभागाने (IMD) विकसित केले असून विजेच्या गडगडाट आणि संभाव्य ठिकाणांची माहिती नागरिकांना वेळेवर मिळवून देण्याचा उद्देश आहे. हे ॲप आपल्या स्थानाच्या 20 किमी परिसरात वीज कोसळण्याची शक्यता असल्यास तात्काळ अलर्ट पाठवते. वापरण्यास अगदी सोपे असून मराठीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. Google Play Store आणि Apple App Store वर हे ॲप मोफत उपलब्ध आहे.
सचेत ॲप – हे ॲप आपत्ती व्यवस्थापन विभागाने विकसित केले असून भूकंप, पूर, वीज चमकणे, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अलर्टस पुरवते. स्थानिक हवामान आणि संभाव्य आपत्तींची अचूक माहिती, सजगता आणि मार्गदर्शन यातून मिळते. या ॲपच्या साह्याने नागरिक वेळेत सुरक्षिततेचे पावले उचलू शकतात. Play Store आणि App Store वर मोफत उपलब्ध आहे.
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वरील खबरदारीचे उपाय वेळेवर आणि शिस्तबद्धपणे पाळावेत. प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी सदैव सज्ज असून नागरिकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.