ऑनलाइन वृत्तसेवा

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

राज्यातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून पुढील करिअरच्या संधी शोधत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर, आता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कॉलेजला (Collage) प्रवेश मिळविण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, तांत्रिक महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अद्याप सुरुवात झाली नव्हती. “दहावी नंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या 20 मे 2025 पासून सुरू होत आहे,” अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी दिली. त्यामुळे, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून, अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये 100 टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील मंत्री महोदयांनी केले आहे. दरम्यान, पॉलिटेक्निक महाविद्यालयातून डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकेच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो. त्यामुळे, पॉलिटेक्निक केल्यानंतर तीन वर्षात इंजिनिअरींगची पदवी मिळते.

दरम्यान, दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञ, अभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *