ऑनलाइन वृत्तसेवा

पाकपुरस्कृत दहशतवादाला जशास तसे उत्तर देऊ-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी साधलेल्या संवादात म्हटलं, आपण सगळ्यांनी देशाचं सामर्थ्य आणि संयम या दोन्ही गोष्टी गेल्या काही दिवसांत पाहिल्या आहेत. मी सगळ्यात आधी भारतीय लष्कर, गुप्तहेर खातं, आपले वैज्ञानिक या सगळ्यांना प्रत्येक भारतीयातर्फे सलाम करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरचं लक्ष्य साध्य करण्यासाठी असीम शौर्य गाजवलं. मी त्यांचं साहस, त्यांच्या पराक्रमाला आज आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला, बहिणीला आणि मुलीला समर्पित करतो.

“२२ एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जी क्रूरता दाखवली, त्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसला. सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेल्या निर्दोष नागरिकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर, मुलांसमोर निर्दयीपणे ठार करणं हा दहशतवादाचा अत्यंत बीभत्स चेहरा होता. क्रूरता होती. देशाच्या भावनेला तोडण्याचा निंदनीय प्रयत्न होता. माझ्यासाठी ही वैयक्तिक पातळीवर प्रचंड वेदनादायी बाब होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, समाज, वर्ग, राजकीय पक्ष एकमताने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी उभा ठाकला”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आपण दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवाद्यांची प्रत्येक संघटना जाणून आहे, की आपल्या माता-भगिनींच्या कपाळावरून कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाहीये. हे देशातल्या कोट्यवधि लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे ची मध्यरात्र, ७ मे ची सकाळ पूर्ण जगाने या प्रतिज्ञाला परिणामात बदलताना पाहिलंय”, असंही मोदी म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *