ऑनलाइन वृत्तसेवा

खासगी अनुदानित शाळांसाठी खुशखबर! शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भातील २८ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाला न्यायालयाने दिलेली स्थगिती फेब्रुवारी २०२४ मध्ये उठवली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थांमधील ३३ हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला आहे.

आता ३० सप्टेंबर २०२३ च्या संचमान्यतेत शाळांनी भरलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात ही भरती होईल.राज्यभरात अंदाजे १० हजारांपर्यंत पदांची भरती या निर्णयामुळे होवू शकते. ऑगस्टअखेर भरतीला सुरवात होवू शकते, अशी माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.

२०१९च्या नंतर खासगी अनुदानित शाळांची संचमान्यता झालेली नाही. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला काहींनी आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर ३० सप्टेंबर २०२३ च्या संचमान्यतेवेळी शाळांनी भरलेली सरल पोर्टलवरील पटसंख्या तीही आधार- व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य मानून शाळांनी संचमान्यतेत भरलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्याठिकाणी बसतात का, याची पडताळणी सध्या सुरू आहे. त्यात वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे.

सप्टेंबर २०२३ मध्ये शाळांनी संचमान्यतेवेळी भरलेली माहिती ऑनलाइन संचमान्यतेत टाकून पटसंख्येच्या प्रमाणात शाळांनी मागणी केलेली पदे खरोखर त्या शैक्षणिक संस्थेत बसू शकतात का, ही बाब तपासून पाहिली जात आहे. २०१३-१४नंतर थेट २०१९मध्येच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संचमान्यता झाली होती. आता ३० सप्टेंबर २०२३च्य संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे अत्यल्प पगारावर किंवा विनापगारावर काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिपाई पदाची भरती स्वतंत्र होणार

शालेय शिक्षण विभागाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार सध्या मुख्य, वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ च्या संचमान्यतेत शाळांनी भरलेली पटसंख्या तीही आधार- व्हॅलिड ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील शिपाई पदांची भरती यावेळी होणार नाही. त्यांची भरती पुढे स्वतंत्रपणे होणार आहे. तुर्तास शिपायांची पदे वगळून उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्थिती

आकृतीबंधानुसार मंजूर पदे

३३,०००

लिपिकांची एकूण पदे

१७,५००

प्रयोगशाळा परिचर, ग्रंथापाल पदे

१५,५००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *