ऑनलाइन वृत्तसेवा

पंढरीत विठुरायाचे दर्शन आणि मंदिराचे नवे रुप पाहून भाविक सुखावणारं

वारकरी संप्रदायातल्या तमाम संतांनी विठुरायाच्या दर्शनाची आस लागल्याची वर्णनं आपल्या रचनांमध्ये केली आहेत. आज इतका काळ लोटूनही तीच भावना पुन्हा एकदा विठ्ठलभक्तांमध्ये दाटून आली आहे.

कारण, दुरुस्तीसाठी पंढरपुरातील विठुरायाचं मंदिर गेल्या अडीच महिन्यापासून बंद होतं. त्यामुळे मंदिर दुरुस्त होणार कधी आणि विठुरायाचं लोभस रूप पाहणार कधी, असा प्रश्न भक्तांना पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून श्री विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जून पासून पुन्हा सुरु होणार.

देवाचे पद दर्शन बंद ठेवल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र पद दर्शनाची प्रतिक्षा आता संपली आहे. श्री विठ्ठल मंदिर आता पूर्ववत सुरु राहणार आहे. मंदिरातील देवाचा गाभारा, सोळखांबी, छत आदींचे काम पूर्णत्वास आले आहे. मुळ मंदिर हे काळया पाषाणात उभारले आहे. मात्र काळाच्या ओघात मंदिरात अनेक बदल करण्यात आले होते. या आधुनिक बदलामुळे मंदिराचे मुळ सौंदर्य लोप पावले होते. मंदिराचे प्राचीन रुप पुन्हा खुलविण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर समितीकडे याबाबतचा विस्तृत प्रस्ताव सादर केला होता. या कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने, या विषयाकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते. मंदिराचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी सचिन ढोले आणि सुनील जोशी यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे या अनुषंगाने पाठपुरावा केला होता. गोऱ्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून 73 कोटी रुपये निधी मंजूर करुन घेतला. या निधीतून मंदिर संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे. मंदिराचे पूर्ण काम होण्यास आणखी दोन वर्षाचा अवधी लागणार आहे. तथापि मंदिरातील गाभारा, छत, सोळखांबी, शिखर आदींचे मजबुतीकरण आणि सौंदर्यकरण अंतिम टप्प्यात आले आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज हौसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड हे कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अडीच महिन्यापासून देवाचे पद दर्शन बंद असल्याने भाविकांनी पंढरपूरला येणे बंद केले होते. मुख दर्शन देखील या काळात सकाळी 6 ते 10 यावेळेत सुरु होते. मात्र आता येत्या 2 जून पासून पुन्हा देवाचे पदस्पर्श दर्शन सुरु होणार असल्याने देवाचे दर्शन आणि मंदिराचे नवे रुप पाहून भाविक सुखावणारं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *