देशनवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चाही जोरात सुरू झाल्या आहेत. कारण गेल्या वर्षभरात आर्थिक आघाडीवरचं अपयश हाच सरकारसाठी सर्वात मोठा आव्हानाचा विषय ठरला आहे. यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पदाबाबत सर्वाधिक चर्चा सुरू आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये देशातील अर्थव्यवस्था सातत्याने ढासळत चालली आहे. तसेच सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनाही फलदायी ठरत नसल्याचे चित्र आहे. त्यातच करोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोडमडली असल्याने ती पुन्हा उभारण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्‍यक आहे. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कारभारावर विरोधी पक्षाकडूनही सातत्याने टीका केली जात आहे.
सध्या अर्थमंत्री पदासाठी प्रख्यात बॅंकर के. व्ही. कामत यांच्या नावाची चर्चा होत आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीही अशा बातम्या आल्या होत्या. कामत हे ब्रिक्‍स देशांच्या नॅशनल डेव्हलपमेंट बॅंकेचे चेअरमन म्हणून 27 मे रोजीच निवृत्त झाले. त्यानंतर या बातम्यांनी आता पुन्हा जोर धरला आहे.
करोनाच्या संकटकाळात सरकारने नुकतेच 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यासाठी सलग पाच दिवस निर्मला सीतारामन पत्रकार परिषदा घेत होत्या. आर्थिक आघाडीवरचं एक मोठे काम त्यांच्याच नेतृत्वात पार पडले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑगस्टपर्यंत सुरू होऊ शकते. त्यामुळे अधिवेशनच्या तोंडावर हा बदल करण्याऐवजी वर्षाअखेरीस बिहार निवडणुकांच्या आसपास हा बदल होऊ शकतो, असे काही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ज्या बदलांची जास्त चर्चा होते, ते मोदी कधीच करत नाहीत. हा पहिल्या पाच वर्षात सर्वांनीच घेतलेला अनुभव आहे. मंत्रिमंडळाच्या फेरबदलात प्रत्येकवेळी कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या परफॉर्मन्सची चर्चा व्हायची. पण पहिल्या टर्ममध्ये ते शेवटपर्यंत कायम राहिले. आताही निर्मला सीतारामन यांच्याबाबतीत हेच होणार का आणि या चर्चा केवळ वावड्याच ठरणार का, याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *