ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

प्रतीक्षा संपली. शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध! सर्वाधिक जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये

राज्यातील हजारो पात्रताधारकांचे लक्ष लागलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या जाहिराती पवित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. एकूण २१ हजार ६७८ पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा समावेश आहे.

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागांवर भरती प्रक्रिया करण्याचे नियोजित आहे. शिक्षक पदांसाठीच्या बिंदूनामावली जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. मात्र बिंदूनामावलीबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने जिल्हा परिषदांच्या १० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील ७० टक्के पदांवर पदभरती केली जाणार आहे. त्या जागांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे. शासन निर्णय आणि शासनाचे विविध विषयांवरील धोरण याचे तंतोतंत पालन करून भरतीप्रक्रिया राबवली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पवित्र संकेतस्थळावर जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदे, १८ महापालिकांतील २ हजार ९५१ पदे, नगरपालिकांतील ४७७, नगरपरिषदांतील १ हजार १२३, खासगी अनुदानित ५ हजार ७२८ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागांवर, तर मुलाखतीसह ४ हजार ८७९ जागांवर भरती केली जाणार आहे.

उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा ८ फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून ९ फेब्रुवारीपर्यंत निश्चित करणे आवश्यक आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

गटनिहाय पदे

पहिली ते पाचवी – १० हजार २४०,

सहावी ते आठवी – ८ हजार १२७

नववी ते दहावी – २ हजार १७६ अकरावी ते बारावी – १ हजार १३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *