खुशखबर! मान्सून केरळात दाखल…
महाराष्ट्रात सुद्धा मान्सून लवकर दाखल होण्याची चिन्हे
पुणे (प्रतिनिधी)- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून आपल्या नियोजित वेळेवर म्हणजे 1 जून रोजी आज केरळात दाखल झाला आहे. अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूजंय मोहापात्रा यांनी दिली.
यंदा मान्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशीराने पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. परंतू पुर्व मध्य-अरबी समुद्रात रविवारी तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राने मान्सूनचे वारे खेचून आणल्याने हा परिणाम झाला. त्यानुसार सोमवारी मान्सून केरळात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून केरळ मध्ये सध्या पाऊस पडत आहे. कर्नाटक महाराष्ट्रामध्ये पुर्व मोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना त्याचे वादळात रूपांतर होणार असल्याने किनारपट्टी लगत मान्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा मान्सून लवकर दाखल होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.