बीडजवळ दोन बस जाळल्या,महामार्गावर टायर जाळले;माजीमंत्री पंडितांच्या गाडीवर दगडफेक
बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.तर माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे
बीड येथील बसस्थानकातून ८ वाजता नेहमीप्रमाणे कोल्हापूर बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७५) मार्गस्थ झाली होती. दरम्यान आहेर वडगाव फाटा परिसरात जमावाने ही बस अडवून प्रवाशांना खाली उतरवून ती पेटवून देण्यात आली. ही बसचे संपूर्ण नुकसान झाले. याच दरम्यान मांजरसुंबा घाटात दुसऱ्या जमावाने अहमदपूर- छत्रपती संभाजी नगर बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू बस न थांबल्याने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे बसच्या इंजिनने पेट घेतल्याचे समजते. या बसमधील प्रवासी तातडीने सुखरूपपणे बाहेर पडले. दोन्ही बसमधील प्रवाशांनी मिळेल त्या वाहनातून बीड गाठले. माहिती मिळताच बीड ग्रामीण व नेकनूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, एसटीचे अधिकारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. दरम्यान बीड येथून जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या असून आरक्षण केलेल्या प्रवाशांना रिफंड मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
रात्री साडेआठ- नऊ वाजेच्या दरम्यान बीड बायपास महालक्ष्मी चौक तसेच धुळे- सोलपूर महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी टायर जाळले. त्यामुळे दोन्ही बाजुने एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
माजीमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांची दगडफेक
शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या गाडीवर मादळमोही येथे आज सायंकाळी मराठा आंदोलकांनी दगडफेक केली. माजीमंत्री पंडित हे मोहिमाता देवीच्या दर्शनसाठी येथे आले असता हा प्रकार घडला.