नव्या संसद भवनाचं उद्घाटन आणि 75 रुपयाचे नाणे लॉन्च होणार
एकीकडे मोदी सरकार आणि RBI ने मिळून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार चलनात 75 रुपयाचं चलन आणणार असल्याची माहिती मिळाली आहे.
28 मे रोजी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी विशेष 75 रुपयांचं नाणंही लाँच केलं जाईल अशी माहिती मिळाली आहे. अर्थमंत्रालयाकडून गुरुवारी याबाबत माहिती देण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. याचं महत्त्व आणि हा सुवर्णक्षण या कॉइनद्वारे संपूर्ण भारतात पोहोचवण्यात येणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचा सिंह आणि त्याखाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं होतं. याशिवाय देवनागरी लिपीमध्ये भारत हा शब्द दुसऱ्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया असं लिहिलं आहे.
या नाण्यावर रुपयाचे चिन्ह देखील असेल आणि अंकांमध्ये 75 लिहिलेले असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल. वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘संसद संकुल’ तर खालच्या बाजूला इंग्रजीत ‘संसद संकुल’ असे लिहिले जाईल. 75 रुपयांचे हे नाणे 44 मिलिमीटर व्यासाचे गोलाकार आकाराचे असेल. त्याच्या बाजूला 200 सेरेशन्स असतील. 35 ग्रॅम वजनाचे हे नाणं 4 धातूंपासून तयार करण्यात आलं आहे. या नाण्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल आणि 5% जस्त चा वापर करण्यात आला आहे.
28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. जुन्या संसद भवनाचं म्युझियम करण्यात येईल. तिथे भेट देणाऱ्यांना कामकाज कसं चालतं याची माहिती दिली जाणार आहे.
या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nrendra Modi) यांच्या हस्ते सकाळी करण्यात येईल. यासाठी संसद भवनात सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. होम-हवनापासून ते राजदंडाची प्रतिष्ठापना करण्यापर्यंतचे सर्व विधी या उद्घाटनाच्या वेळी करण्यात येणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
कसा असणार संपूर्ण सोहळा?
हा संपूर्ण सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी सध्या दिल्लीमध्ये तयारी सुरु आहे. 28 मे रोजी सकाळी तमिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत वैदिक विधींनुसार लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजेच राजदंड लावतील. त्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सभा करण्यात येईल. या सोहळ्याला शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करतील. तसेच उभसभापती हरिवंश हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन देखील करतील. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. यावेळी नाणे आणि टपाल तिकीट देखील काढण्यात येणार आहे. तसेच यावेळी 75 रुपयांचे नाणे देखील काढण्यात येईल. तर दुपारी अडीच या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
कशी आहे ही नवी इमारत?
ही संसदेची नवी इमारत चार मजली आहे तर या संसदेला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे एक हजार आणि राज्यसभेचे जवळपास 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील. तसेच या बाकांमध्ये हजेरी,मतदान तसेच भाषांतर ऐकण्यासाठी आत्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात 120 कार्यालयं आणि म्युझियम तसेच गॅलरीही असतील.
सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण सांसद टिव्ही या वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच अनेक प्रसार माध्यमांच्या वाहिन्यांवर देखील या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सोहळ्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सोहळ्याचे आमंत्रण अनेक राजकिय नेत्यांना दिले आहे. आंध्र प्रदेशचे सत्ताधारी वायएसआरसीपीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी 25 राजकिय पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर 20 विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.