स्थगिती असलेल्या शिक्षकांच्या बदल्या न करता मूळ जागेवरच ठेवण्याचे आदेश
राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील ज्या शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे, अशा शिक्षकांना सध्या तरी त्यांच्या मूळ शाळेवरून त्यांना मुक्त (रिलिव्ह) करू नका, सध्या त्यांना त्यांच्या मूळ शाळांवरच राहू द्या, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागातील उपसचिव पो.द. देशमुख यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.
राज्य सरकारच्या या आदेशामुळे उच्च न्यायालयाने बदल्यांना अंतरिम स्थगिती दिलेल्या शिक्षकांना किमान उच्च न्यायालयातील प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत त्यांच्या मुळ शाळेवर राहता येणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या सहाव्या फेरीतील बदल्यांना काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यामुळे उच्च न्यायालयाने सहाव्या फेरीतील बदल्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. या आदेशानुसार या याचिकांवर येत्या ७ जून रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका पत्राद्वारे गुरुवारी (ता.४) हा आदेश दिला आहे.
वयाच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी डेडलाईन ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली आहे. याशिवाय अतिदुर्गम भागात बदली झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे. त्यामुळे या बदल्यांना स्थगिती देण्याच्या मागणी करत जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.