बीड

बीडच्या किल्ला मैदानावर आढळले पुरातन हेमांडपंथी श्री महालक्ष्मी मंदिर

बीड – चंपावतीनगरी अशी ओळख असलेल्‍या बीड शहरात किल्ला गेट परिसरात असलेले पुरातन हेमाडपंथी श्री महालक्ष्मी मंदिर कचर्‍याच्‍या ढिगार्‍याखाली बुजवण्‍याचा प्रयत्न होत आहे. या ऐतिहासिक मंदिरामध्‍ये कचर्‍यासह ड्रेनेजचे पाणी सोडून मंदिराची जाणीवपूर्वक विटंबना करण्‍यात येत आहे, असा आरोप महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. हे मंदिर विटंबनेपासून आणि अतिक्रमणापासून तात्‍काळ मुक्‍त करावे. येत्‍या १५ दिवसांत प्रशासनाकडून या प्रकरणी कारवाई न झाल्‍यास मनसे हे मंदिर अतिक्रमणमुक्‍त करेल, अशी चेतावणी मनसेचे राज्‍य उपाध्‍यक्ष अशोक तावरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

१. अशोक तावरे यांनी या वेळी सांगितले की, आम्‍ही मंदिराविषयी जाणकार वयोवृद्ध नागरिकांना विचारले असता त्‍यांनी सांगितले की, हे मंदिर कंकालेश्‍वर मंदिराच्‍या समकालीन श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर आहे; मात्र मंदिराच्‍या परिसरात मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात असल्‍याने मंदिराकडे दुर्लक्ष झाले आहे. ही वास्‍तू अठराव्‍या शतकातील असल्‍याचे ही काही नागरिकांनी सांगितले.

२. या प्रकरणी मनसेने जिल्‍हा प्रशासनाकडे ऐतिहासिक वास्‍तूची दुरवस्‍था थांबवावी, असे निवेदनही दिले आहे. निवेदनानंतर नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिकारी नीता अंधारे यांनी घटनास्‍थळी भेट देऊन पहाणी केली.

३. वास्‍तूला भेट दिल्‍यानंतर नीता अंधारे यांनी सांगितले की, प्रशासनाच्‍या वतीने लवकरच पुरातत्‍व विभागास पत्र दिले जाईल. त्‍यानंतर पुरातत्‍व विभाग सर्वेक्षण करून ही वास्‍तू नेमकी कोणत्‍या काळातील आहे, हे स्‍पष्‍ट करेल.

पुरातत्‍व विभागाचे बीड नगरपालिकेला पत्र

श्री महालक्ष्मी मंदिराचे जतन होऊन मंदिरात जाण्‍यासाठी मार्ग उपलब्‍ध करून देण्‍यात यावा !

मनसेच्‍या चेतावणीनंतर महाराष्‍ट्र शासनाच्‍या साहाय्‍यक संचालक, पुरातत्‍व विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी २१ एप्रिल या दिवशी बीड नगरपालिकेच्‍या मुख्‍याधिकार्‍यांना पत्र पाठवून महालक्ष्मी मंदिराचे जतन करून स्‍वच्‍छता आणि दुरुस्‍ती करण्‍याच्‍या संदर्भात कळवले आहे.पुरातत्‍व विभागाचे साहाय्‍यक संचालक अमोल गोटे यांनी नगरपालिकेला दिलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, बीड शहरातील किल्ला गेट परिसरात मिलिया महाविद्यालयाच्‍या मागे कागदी वेस येथे महालक्ष्मी मंदिर या स्‍थानिक नावाने परिचित असलेली हेमाडपंथी वास्‍तू आहे.

या मंदिराच्‍या ठिकाणी घाण आणि कचरा टाकण्‍यात येत आहे. त्‍यामुळे मंदिराची दुरवस्‍था झाल्‍याच्‍या तक्रारी कार्यालयास प्राप्‍त झाल्‍या आहेत. आमच्‍या पहारेकर्‍यांनी पहाणी केली असता ते निदर्शनास आले आहे. सद्यस्‍थितीत हे मंदिर असंरक्षित आहे. असंरक्षित पुरातन स्‍मारकाच्‍या दृष्‍टीने स्‍थानिक प्रशासनाचे नियमन, परिपत्रक १९८२ अन्‍वये या स्‍मारकाचे संरक्षण करणे आवश्‍यक आहे. या स्‍मारकाची कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्‍यावी. स्‍मारकाच्‍या जवळपास स्‍वच्‍छतागृह किंवा मुतारी असे बांधकाम असल्‍यास ते काढून टाकण्‍यात यावे. स्‍मारकास लागून खासगी भूमी असल्‍यास स्‍मारकाच्‍या बाजूने संरक्षित क्षेत्र सोडण्‍यात यावे. स्‍मारकात पोचण्‍यासाठी मार्ग उपलब्‍ध करून देण्‍यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *