ऑनलाइन वृत्तसेवा

घातक विषाणूचे दोन बळी; सरकार मार्गदर्शन सूचना जाहीर करणार

राज्यात एच३एन२ इन्फ्लुएन्झामुळे आत्तापर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, इतरही रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून, ऑक्सिजनचा साठा सज्ज ठेवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून, लवकरच यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार असल्याचे तानाजी सावंत यांनी यावेळी जाहीर केले.
राज्यातील इन्फ्लुएन्झा संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर यासंदर्भात निवेदन करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वरील माहिती दिली. ‘नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असून, मास्क वापरावे, नियमित हात धुवावे, थोडे अंतर राखावे, ताप किंवा अंगदुखी असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा’, असे आवाहनही तानाजी सावंत यांनी केले. ‘इन्फ्लुएन्झा हा विषाणूमुळे होणारा आजार असून, त्याचे एच१एन१ आणि एच३एन२ असे दोन प्रकार आहेत. हा आजार मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील शहरी भागात आढळून आला आहे. राज्यात एच१एन२चे ३०३ आणि एच३एन२चे ५८ रुग्ण आढळून आले आहेत. इन्फ्लुएन्झामुळे झालेल्या मृत्यूमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील २३वर्षीय वैद्यकीय विद्यार्थ्याचा समावेश आहे. चंद्रकांत सपकाळ असे त्याचे नाव असून, तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. त्याच्या तपासणीत करोना तसेच इन्फ्लुएन्झाचे एच१एन१ आणि एच३एन२ असे दोन विषाणू आढळून आले आहेत. तर नागपूर येथील ७४वर्षीय ए. के. माजी यांचाही मृत्यू ओढवला असून, एच३एन२ विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे’, अशी माहिती सावंत यांनी दिली.
दर तीन तासांनी आढावा
एच१एन१ आणि एच३एन२चे रुग्ण वाढत असल्याने राज्यात सर्व जिल्हा रुग्णालय ते ग्रामीण आरोग्य केंद्रांना सतर्क केले असून, संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच ऑक्सिजन प्रकल्प सज्ज ठेवले असून, या आठवड्यात आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत का, याचा दर तीन तासांनी आढावा घेतला जात आहे’, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

सरकारचे आवाहन…

सतर्क राहा
मास्क वापरा
नियमित हात धुवा
एकमेकांपासून अंतर राखा
ताप, अंगदुखी असल्यास डॉक्टरी सल्ला घ्या

महाराष्ट्रात काय आहे स्थिती
राज्यावर पुन्हा एका कोरोनाचे संकट घोंघावत आहे.  H3N2 सोबतच कोरोनाने आता राज्याचं टेंशन वाढवले. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या राज्यात H3N2 चे 352 रुग्ण आहेत. H3N2 नं राज्यातला पहिला बळी घेतलाय. अहमदनगरमध्ये एका तरुणाचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.  तर नागपूरमध्ये H3N2 मुळे एका 78 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये H3N2 व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतेय.  सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणं दिसली तरी डॉक्टरांकडे जा.  कोरोनासंबंधी कुठलंही लक्षण असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सूचना करण्यात येत आहेत.
विशेषतः गर्भवती महिला, 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये हा फ्लू झपाट्यानं पसरत आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांमध्येही एन्फ्लूएन्झा संक्रमित होण्याचा धोका जास्त आहे. खोकला, नाक वाहणे किंवा बंद होणे. गळ्यात खवखव, तापडोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे आणि थकवा अशी या व्हायरलसची लक्षणे आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *