बीड

बीडमध्ये श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांची श्रीमद्भागवत कथा


बीड दि. ३१ (प्रतिनिधी) बीड शहरात श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२३ दरम्यान श्रीमद्भागवत कथा संपन्न होत असून आजपर्यंत बीड शहरामध्ये श्रीशंकराचार्य महाराज, श्रीगुरु माधवानंदमहाराज, श्रीगुरु यज्ञेश्वरशास्त्री सेलूकर यासह विविध संत, महंतांचे मोठमोठे भव्यदिव्य आणखी व्यापक कार्यक्रम आपण सर्वांनी एकजुटीने आणि सर्वांच्या सहकार्याने संपन्न केलेले आहे, त्यामुळे बीडकरांना मोठमोठ्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा दांडगा अनुभव असून श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांची श्रीमद्भागवत कथा ही त्याच धर्तीवर भव्यदिव्य प्रमाणात विधिवत आणि शिस्तीत संपन्न करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असून श्रीगुरु चैतन्यमहाराजांची भागवत कथा हा बीडकरांसाठी सुवर्णक्षण असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठविधीज्ञ कालिदास ( नाना) थिगळे यांनी तर श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञातून बीडकरांच्या ऐक्याचे व भाईचाऱ्याचे दर्शन घडावे, कोणत्याही कार्यक्रमासाठी हजारो हातांची गरज असते त्यातूनच तो कार्यक्रम यशस्वी होत असतो त्या कारणाने श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून ही भागवत कथा सर्वांच्या सहभागातून तिची अधिकाधिक व्याप्ती वाढणार असल्याचे प्रतिपादन संपादक श्री नामदेव (दादा) क्षीरसागर यांनी केले.


सोमवारी श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती कार्यालय सहयोग नगर येथे श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीचे पदाधिकारी, समिती कार्यकर्ते, बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठविधीज्ञ अॅड. कालिदास (नाना) थिगळे, संपादक नामदेव (दादा) क्षीरसागर, अॅड. सी.डी. (दादा) देशमुख, समितीचे अध्यक्ष विनायक महाराज पाटंगणकर, समितीचे कार्याध्यक्ष संपादक दिलीपराव खिस्ती, वे.शा.स.अमोलशास्त्री जोशी, ह.भ.प. एकनाथमहाराज पुजारी, रामराजे राक्षसभुवनकर, श्रीनिवास कुलकर्णी, नवनाथ कुलकर्णी कुंभारीकर, विकास उमापूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती


पुढे बोलताना थिगळे नाना म्हणाले की श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी बीड शहरात समितीच्या वतीने मागील काळापासून विविध नियोजनाच्या बैठका, महिला समितीच्या बैठका यासह येणाऱ्या मान्यवरांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, शोभायात्रा, वाहतूक व्यवस्था तसेच भागवत कथा परिसरातील सुरक्षा आणि सुरक्षितता या संदर्भामध्ये नियोजन करण्यात येत असून समितीच्या वतीने बीड शहरासह जिल्ह्यात निमंत्रण पत्रिका पोहोचविल्या जात आहेत तरी या भागवत कथा ज्ञान यज्ञासाठी महिला, पुरुष भाविकभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्ति श्रवणानंदाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी बोलताना संपादक नामदेव दादा क्षीरसागर म्हणाले की कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन आणि हजारो हात उभे राहिले तर कार्यक्रमाला शोभा येत असते त्यामुळे श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी बीड शहरासह जिल्ह्यातील महिला, पुरुष भाविकभक्तांनी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी प्रास्ताविक करताना कार्याध्यक्ष संपादक दिलीप खिस्ती सर म्हणाले की श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ यशस्वी करण्यासाठी आणि भव्य दिव्य प्रमाणात संपन्न करण्यासाठी समितीच्या वतीने विविध आवश्यक परवाने आणि नियोजन, जनजागृती, निमंत्रण पत्रिका पोहोच करणे यासह आवश्यक नियोजन झाले असून जिल्हा प्रशासनाचे तसेच नगरपालिका, पोलीस प्रशासन, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक यासह महिला, पुरुष भाविकभक्तांचे मोठे सहकार्य याकामी लाभत असून श्रीमद्भागवत कथेच्या दरम्यान भव्य रक्तदान शिबिर, त्याबरोबरच भव्य आरोग्य शिबीर जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने संपन्न होत असून कथा अधिकाधिक भव्य दिव्य करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आणि तन-मन-धनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


या कथेचे आभार व्यक्त करताना ह.भ.प. श्री एकनाथमहाराज पुजारी यांनी श्रीमद्भागवत कथा श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या अमृतवाणीतून श्रवण करण्याची बीडकरांना मोठी पर्वणी उपलब्ध झाली असून ही कथा अधिकाधिक भाविक भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजन समितीच्या वतीने योग्य असे नियोजन करण्यात येत असून बीड शहरातील भाविकभक्तांनी कथा श्रवणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या बैठकीसाठी बीड शहरातील महिला, पुरुष भावीकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


रक्तदान शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन- संपादक दिलीप खिस्ती
श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाच्या निमित्ताने रामकृष्ण लॉन्स मंगल कार्यालयात दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे अशा दात्यांनी श्रीमद्भागवत कथा ज्ञान समिती बीड यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन श्री संपादक दिलीपराव खिस्ती, विकास उमापूरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *