आज लक्ष्मीपूजनासाठी ‘हा’ मुहूर्त आहे शुभ:या वेळेतच करा पूजन
धन-धान्य आणि ऐश्वर्य लाभावे अशी प्रार्थना करून पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यासाठी सोमवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजल्यापासून मुहूर्त आहेत. सुवासिक तेल आणि सुंगधी उटणे लावून नरक चतुर्दशीनिमित्त सोमवारी पहाटे अभ्यंगस्नान केल्यानंतर दुपारनंतर लक्ष्मीपूजन करण्याचे मुहूर्त आहेत.
दुपारी तीन ते रात्री साडेआठ आणि रात्री साडेआठ ते बारा या वेळात घरोघरी आणि व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि पेढ्यांमध्ये आपल्या सोयीनुसार लक्ष्मीपूजन करावे, असे दाते पंचागकर्तेचे माेहन दाते यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ असते, त्याप्रमाणेच व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते. या पूजेमध्ये समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा असा स्वतंत्र मुहूर्त नसतो. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतरच्या अडीच तासांमध्ये लक्ष्मीपूजन करावे असे शास्त्र सांगते, असे दाते यांनी सांगितले.