उद्याच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा होणार
नवी दिल्ली – देशात आता ‘एक राष्ट्र, एक खत’ योजना राबवली जाणार असून याचा एक भाग म्हणून देशातील शेतकऱ्यांना पुरवले जाणारे अनुदानित युरिया खत ( Fertilizer ) आता ‘भारत’ या एकाच ब्रॅंड अंतर्गत वितरित केले जाणार आहे. राजधानी दिल्लीत 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या किसान संमेलनात भारत ब्रॅंड युरियाच्या वितरणाला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात केली जाणार आहे. या कार्यक्रमात 600 पीएम किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पुसा संकुलातील मेळा मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता जमा करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचे थेट सहाय्य प्रदान केले जाते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘इंडियन एज’ नावाच्या आंतरराष्ट्रीय साप्ताहिकाचेही प्रकाशन केले जाणार आहे.
या संबंधात पत्रकारांना माहिती देताना, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की खत ( Fertilizer ) क्षेत्रातील सर्वात मोठ्या वाटचालीत, देशातील सर्व खते – युरिया, डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी), म्युरिएट ऑफ पोटॅश (एमओपी) आणि एनपीके -भारत या एकाच ब्रॅंडखाली विकले जातील. भारत युरिया असे लिहिलेल्या खतांच्या पिशव्या आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. अनुदानित खतांची विक्री याच भारत ब्रॅंडद्वारे करणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. देशातील खत ( Fertilizer ) विक्री केंद्राचे रूपांतर पीएम किसान समृद्धी केंद्रात केले जाणार आहे.