जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या पिक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा-जिल्हाधिकारी शर्मा
अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बीड/प्रतिनिधी
जिल्ह्यातील अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकांचे नुकसान झाले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज प्रत्यक्ष बांधावर जावून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला व झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली .
बीड तालुक्यातील नेकनूर ,राजुरी न.,मांजरसुंबा या महसूल मंडळातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर,तहसिलदार सुहास हजारे,तालुका कृषी अधिकारी तसेच महसूल, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या पीकनुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले आहेत.
गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याकडून संयुक्त पंचनामे करण्यात येणार असून तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी पीक नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी कार्यवाही करतील असे यावेळी सांगण्यात आले.
जिल्ह्यात मागील दोन दिवसात विविध मंडळातील गावात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाले आहे त्याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांसह थेट शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. एकट्या बीड तालुक्यातील 11 पैकी तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले आहे यापैकी नेकनूर मंडळातील येळम घाट व मांजरसुंबा मंडळातील सफेपुर येथे पाहणी केली.
याचबरोबर नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी पिक विमा भरलेल्या जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकांचे नुकसान झाले असेल तर
पिक विमा कंपनीकडे नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतक-यांनी वेळीच तक्रारी दाखल करण्याची काळजी शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.