बीडसह मराठवाड्यात पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम:परतीच्या पाऊस चार दिवस
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भ आणि मराठवाडा भागातील पाऊस कमी झाला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे.
केरळ आणि आसपासच्या भागात चक्रीय स्थिती आहे. केरळपासून मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हा पट्टा मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक पार करून पुढे गेला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १२ ऑक्टोबरपर्यत पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वच भागात मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. आता हा पाऊस कमी होत चालला असून विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यातील पाऊस कमी झाला आहे.
दरम्यान, कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदूरबार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली, मराठवाडय़ातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे.
चार दिवसांत परतीचा प्रवास
र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी २० सप्टेंबरला पश्चिम-उत्तर राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मात्र, त्याचा हा प्रवासही खोळंबला. ३ ऑक्टोबरनंतर परतीच्या प्रवासाला काहीसा वेग आला आहे. त्यानुसार संपूर्ण राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग आणि मध्य प्रदेशचा काही भागातून पाऊस माघारी फिरला आहे. येत्या चार दिवसांत तो मध्य भारतातील काही भागातून परतीचा प्रवास करणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.