ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर ऐवजी आता 16 ऑक्टोबर रोजी मतदान
मुंबई, दि. 26 (रानिआ): विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल; तर मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.