ऑनलाइन वृत्तसेवाऔरंगाबाद

नाथसागर धरणाचे २७ दरवाजे उघडले:सतर्कतेचा इशारा

पैठण येथील नाथसागर धरणामध्ये इतर धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे धरणाच्या आपत्कालीन दरवाजासह यावर्षी प्रथमच २७ दरवाजे खुले करण्यात आले आहेत.

गोदावरी नदीत ८० हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे यांनी घेतला. यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे.

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवून औरंगाबाद ,जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना जायकवाडी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान विसर्ग दिड लाख क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात येणाची शक्यता धरण प्रशासनाने वर्तविल्याने शनिवारी सायंकाळी पैठणकरांचेही धाबे दणाणले. शहरात पाणी घुसेल या भितीने नदीकाठच्या भागासह व्यापाऱ्यांचीही धावपळ उडाली.

शुक्रवारी (दि. १६) रोजी नाथसागर धरणाच्या पाणीलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढू लागला. दरम्यान पाणी पातळी वाढल्यामुळे सर्वच दरवाजासह धरणाचे क्रमांक १ ते ९ असे एकूण ९ आपत्कालीन दरवाजे पाच फूट खुले करण्यात आले आहेत. गोदावरी नदीमध्ये ८० हजार १७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन प्रमुख तहसीलदार शंकर लाड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *