दिल्लीत होणाऱ्या अमृत महोत्सवात बीडची कन्या ऐश्वर्या बायस महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार
बीड: दिल्लीत होणाऱ्या अमृत महोत्सवात बीडची कन्या ऐश्वर्या बायस ही आता महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे.
यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून तिची निवड करण्यात आली आहे. 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीत एक ते पाच ऑगस्टदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठीच ऐश्वर्याची निवड करण्यात आली आहे.
लावणीवर ठेका धरत नृत्याविष्कार करणारी ऐश्वर्या बायस ही बीड शहरातील पिंगळे गल्लीत राहते. ऐश्वर्या ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तिच्या मेहनतीचं अखेर चीज झालं आहे. कौटुंबिक परिस्थिती ही जेमतेम, वडील संतोष बायस हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. तिचा भाऊ हा देखील आयटी इंजिनिअर… वयाच्या पाचव्या वर्षापासून ऐश्वर्याला नृत्याची फार आवड, दरम्यान आतापर्यंत विविध झालेल्या स्पर्धेत तिने 500 हून अधिक पारितोषिक पटकावले आहेत.
कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असताना देखील ऐश्वर्याने जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. लोककला, लोकनृत्य, लोकनाट्य यातून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या निवडीनंतर आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर होत आहेत. मुलीने कष्टाचं चीज केल्याने तिच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही.
दिल्लीत संधी मिळाल्याने या संधीचं सोनं करण्याची जिद्द वाखण्याजोगीच म्हणावी लागेल. ग्रामीण भागातील मुलांमध्ये कला गुण असतात. मात्र त्याला व्यासपीठ मिळत नाही. आणि यालाच न जुमानता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं तर नक्कीच यश मिळतं. हेच ऐश्वर्याने सिद्ध करून दाखवलं आहे.