आघाडीला बहुमत सिध्द करण्याचे आदेश:उद्या होणार सत्ता संघर्षाचा निकाल
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राज्यपालांनी हे पत्र लिहलं आहे. राज्यपालांच्या या पत्रानंतर आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल.
दरम्यान, आम्ही उद्या मुंबईत जाणार आहोत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दिली आहे. शिंदे यांनी बुधवारी सकाळी गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे पत्र प्राप्त झाल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला तशी मुभा दिली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अपात्र ठरविण्याच्या नोटिशींविरोधातील बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी विश्वासदर्शक ठरावाचा मुद्दा आला होता.
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दय़ावर निर्णय होत नाही तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली होती. ही सुनावणी झाली तेव्हा विश्वासदर्शक ठरावाचा कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. असा आदेश दिला तर आमच्याकडे या, असे न्यायालयाने म्हटले होते.