राज्य शासनाचे संगीत विद्यापीठ उभारणार–सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
पुणे दि.१०- राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.विश्वजीत कदम, स्ट्रॅटजिक फोरसाईट ग्रुपचे संदिप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, गौर गोपाल दास, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे, कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप, विजयमाला कदम आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले,भारती विद्यापीठाला वैश्विक स्वरूप लाभले आहे. यामागे डॉ. पतंगराव कदम यांची दूरदृष्टी होती. आज जगातील नामांकित विद्यापीठ म्हणून विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठाने साहित्य, संगीत, क्रीडा क्षेत्रात विस्तार करताना सामाजिकता जपली. विद्यापीठाने संगीत शिक्षणाच्या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या अनुभवाचा शासनाला उपयोग होईल.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या भारती विद्यापीठ सारख्या संस्थांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. विद्यापीठाने वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करताना राज्यात आपला विस्तार वाढवावा आणि मराठवाड्यातही ज्ञानदानाचे कार्य सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संशोधनासाठी निधी राखून ठेवला जाईल असेही श्री. देशमुख म्हणाले.