बीड

स्व मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण घरातच थांबून करा-माजीमंत्री पंकजा मुंडे यांचं आवाहन

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जून रोजी पुण्यतिथी आहे. कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे पुण्यतिथी घरीच थांबून करायची. या दिवशी साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून अभिवादन करायचे, असे आवाहन माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

3 जून रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह असेल कोणीही गडावर गर्दी करु नये, अशा सूचना सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. पंकजा यांनी फेसबुक पोस्टद्वारे आणि ट्विटरवर हे आवाहन केलं आहे.

Pankaja Gopinath Munde@Pankajamunde

03 जुन, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण.
एक आवाहन..!#SangharshDin

View image on Twitter

‘3 जून’ तसं मी या दिवसाची वाट आजिबात पाहत नाही!! अगदी 2 जून 2014 ला जाऊन जग थांबावं असं वाटतं. मनात आनंद, उत्साह, समाधान होतं 2 जूनला… बाबा पोटभर रसपोळी खाऊन गेले होते.. शाहू म्हणाला, “आज साहेबांनी खूप आमरस खाल्ला”.. “खाऊ दे रे शाहू” असं त्याला तेच म्हणाले.. तेच अखेरचं जेवण त्यांचं स्वतःच्या घरी.. मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही.. म्हणून 3 जून उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते ..

तरी झाले की 6 वर्ष पूर्ण आपण जगतोय आणि जागवतोय ही मुंडे साहेबांच्या स्मृती, त्यांचे विचार, त्यांच्या प्रति च प्रेम … कारण तीच आपली शक्ती आणि पुढील मार्गावर जाण्याची प्रेरणा आहे..हो ना?? सध्या कोरोनाच्या या थैमानात सर्वाना प्रतिकार शक्ती व उत्तम आरोग्य लाभो हीच माझी प्रार्थना आणि शुभेच्छा आहे आणि त्यानुसारच 3 जूनचं नियोजन असावं .. तसं 3 जूनचा दिवस #संघर्ष_दिन म्हणून आपण साजरा करतो, गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असतो, ढोक महाराजांच कीर्तन असतं, मग प्रमुख कार्यक्रम आणि प्रसाद असा दरवर्षीचा नियम असतो … पण यावेळी संघर्ष वेगळा आहे, सर्वांनी कोरोनामुळे काळजी घ्यायची व लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करायचे आहे, ही माझी विनंती आहे.. यावर्षी कोणीतीही गर्दी करायची नाही. दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही …

गडाचा कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल तो Live दाखवता येईल. तुम्ही सर्वांनी कुटुंबा मवेत मुंडे साहेबांच्या फोटो समोर उजव्या बाजूला घरातील महिला आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहून दोन दिवे/समई लावायच्या आहेत. आजी, सून, नात उजवीकडे तर आजोबा, मुलगा, नातू डावीकडे असं उभं राहून दिवा लावायचा आहे.. साहेबांचा आवडता पदार्थ बनवयाचा तो काय मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे. कोणतही एक समाज कार्य करायचं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत, अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप इत्यादी.. सर्व कुटुंबीयांनी हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पाठवायचे आहेत. दुपारी 12.00 ते सायंकाळी 6.00 मध्ये आपण हे कार्य करुन कृपया शेअर करावे. आणि स्वतःला जपा, गर्दी करु नका, घरात राहा, तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे. कराल मग एवढं? गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी! करा असेही आवाहन माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *