ऑनलाइन वृत्तसेवाविशेष वृत्त

आज अक्षय तृतीया:साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त,हिंदू धर्मातील या दिवसाचे महत्व

आज अक्षय्य तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे, अक्षय्य तृतीया . हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असतं.

विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. वैशाख शुल्क पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच, तिसऱ्या दिवसी हा सण साजरा केला जातो. या वर्षी 3 मे 2022 रोजी अक्षय्य तृतीया हा सण आहे. अक्षय्य तृतीयेला (Akshay Tritiya) आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात.

अक्षय्य म्हणजे कधीही न नष्ट होणारे, न संपणारे. अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी दान करण्यालाही अतिशय महत्त्वं आहे. या दिवशी दान केल्यामुळं कधीही न नष्ट होणारं, न संपणारं पुण्य प्राप्त होतं. शिवाय पितरांचे आशीर्वादही मिळतात.

या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हिंदू धर्मात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया विशेष मानली जाते. असं म्हटलं जातं की, या दिवशी केलेलं शुभ कार्य अक्षय्य फळ देतं, अशी श्रद्धा आहे. अक्षय्य तृतीयेला तुम्ही जे काही शुभकार्य कराल, त्याचा लाभ कधीही नष्ट होत नाही, ते तुमच्याकडे अनेक पटीनी येतं. म्हणूनच याला ‘अक्षय्य’ म्हणतात. जाणून घेऊया अक्षय्य तृतीयेचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त…

शुभ मुहूर्त

तृतीया तिथी मंगळवार, 3 मे 2022 रोजी सकाळी 05.19 पासून सुरू होईल आणि 4 मे रोजी सकाळी 07.33 पर्यंत राहील. पौराणिक कथेनुसार, या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते, त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे.

अक्षय्य तृतीयेचं महत्त्व

हिंदू आणि जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणताही विचार न करता कोणतंही नवीन काम सुरू करता येतं. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, इमारत किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी, घरात प्रवेश करण्यासाठी, दागिने, कपडे, वाहने इत्यादी खरेदी करण्यासाठी, लग्न समारंभ, मुंज समारंभ इत्यादीसाठी पंचांग पाहण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला आवडणारं कोणतंही काम तुम्ही मोकळेपणानं करू शकता, कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकता.

अक्षय्य तृतीयेचं पौराणिक महत्त्व

अक्षय्य तृतीयेला पौराणिक महत्त्वही आहे. या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं. द्वापर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.

व्रत आणि उपासनेलाही विशेष महत्त्व

जैन धर्माचे पहिले प्रवर्तक ऋषभदेव जी महाराज यांनी अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर या दिवशी उसाच्या रसाने उपवास सोडला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी व्रत आणि उपासनेलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा पांढरे कमळ किंवा पांढरं गुलाबाचं फूल देऊन केली जाते. या दिवशी पूजा केल्यानंतर जव किंवा गव्हाचा सत्तू, काकडी, हरभरा डाळ यांचा प्रसाद वाटला जातो. पूजेनंतर ब्राह्मणाला फळे, फुले, भांडी, कपडे इत्यादी दान केलं जातं.

विविध वस्तूंचे दान

अक्षय्य तृतीया हा वसंत ऋतूचा शेवट आणि उन्हाळ्याच्या प्रारंभाचा दिवस असल्याने या दिवशी उन्हाळ्यात पाण्याने भरलेली भांडी, पंखे, स्टँड, छत्री, कानटोप, साखर, तांदूळ, मीठ इत्यादींचं दान केलं जातं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *