ऊसतोड कामगाराच्या मुलाचे नेत्रदीपक यश:राज्यकर निरीक्षकपदी निवड:आ आजबे यांच्या हस्ते सत्कार
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोड काम करण्याऱ्या कामगाराचा मुलगा भुजंग मिसाळ याची राज्य कर निरीक्षक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
दि 8 एप्रिल रोजी आष्टी येथे नुकताच भुजंग मिसाळ यांचा आष्टी पाटोदा मतदार संघाचे आ बाळासाहेब आजबे व महिला अध्यक्षा रेखा ताई फड यांच्या हस्ते भुजंग याचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी जि प सदस्य नाकाडे बाळासाहेब गरजे सचिन भिमराव मिसाळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
पांगरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील भुजंग पांडुरंग मिसाळच्या कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन ऊसतोड करून मिळणारी मजुरी हे आहे. वर्षातील सहा महिने कुटुंबाचे वास्तव्य साखर कारखानास्थळी उसाच्या पाचटापासून तयार केलेल्या झोपडीत जाते. उर्वरित सहा महिने गावाकडे मिळेल ती मजुरी करावी लागते.भुजंगचे प्राथमिक शिक्षण पांगरा (ता. आष्टी, बीड) येथे आजीकडे, माध्यमिक शिक्षण सुरडी (ता. आष्टी, बीड) येथे मामाकडे तर उच्च माध्यमिक शिक्षण शिरूर (ता. शिरुर, जि. बीड) येथे मावशीकडे पूर्ण केले अन शिक्षणाची सोय नसल्याने पुढील शिक्षणाला ब्रेक लागला. मात्र, भुजंगने हार न मानता वडिलांबरोबर ऊस तोडणी करून मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश घेतला. दिवसभर ऊस तोडणीचे काम करायचे.रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, हा त्याचा दिनक्रम होता. तीन वर्ष ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा (ता. नेवासा, जि. नगर) येथे ऊस तोडणी करत पदवी घेतली. पुढे काय करायचे, याचा मार्ग सापडत नव्हता. मार्ग शोधण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने पुणे परिसरात काम करायचा निर्णय घेतला. त्यानुसार ते संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासारसाई दारुंब्रे येथे ऊसतोड करण्यासाठी आले.
एका मित्राकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा मार्ग सापडला अन भुंजगने आपले प्रयत्न सुरु केले. मित्राबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे सुरु केले. पाच वेळा थोड्या मार्कावरुन संधी गेली तरीही हताश न होता त्याने अभ्यास पद्धतीत बदल करून परीक्षा देणे सुरु ठेवले. दिवसभर ऊसतोडणी करायची अन रात्री उशिरापर्यंत कारखानास्थळी झोपडी समोरील रस्त्यालगतच्या विजेच्या दिव्यावर अभ्यास करायचा, हा उपक्रम सतत चालू ठेवला. अखेर सहाव्या प्रयत्नात त्याने यश संपादन केले. राज्य कर निरीक्षक परीक्षेचा निकाल लागला असून, या परीक्षेत पास होऊन त्याची निवड झाली अन त्याच्यासह पालकांचे स्वप्न साकार झाले.