ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

2 मे 2022 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर:13 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार

मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची या वर्षांची म्हणजेच 2022 सालाची उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच 2022-23 हे शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचं शालेय शिक्षण विभागाने परीपत्रक जारी केलं आहे. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी 2022 सालाची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची सोमवारपासून म्हणजेच 2 मे 2022 पासून उन्हाळी सुट्टी सुरु होईल. हा सुट्टीचा कालावधी 12 जूनपर्यंत असेल. तर 2022-23 चे पुढील शैक्षणिक वर्ष हे 13 जूनपासून सुरु होईल. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार म्हणजेच 27 जून, 2022 रोजी सुरू होतील.

इयत्ता १ ली ते ९ वी व ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल, २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल, तथापि तो निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील.

  • शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.असे सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *