घरांच्या किमती वाढल्या:कोणत्या बँका स्वस्त दरामध्ये ग्राहकांना होम लोन देतात
महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, कच्चा मालाच्या किमती वाढल्याने घराचे दर देखील वाढले आहेत. मात्र या सर्वांमध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे सध्या अनेक बँका अगदी स्वस्त दरामध्ये ग्राहकांना होम लोन ( Home loan ) उपलब्ध करून देत आहेत.
सध्या अनेक बँका आणि पतसंस्था आपल्या ग्राहकांना सात टक्के व्याज दराने (Home loan rates) होम लोन उपलब्ध करून देत आहेत. होम लोनचा सात टक्के व्याज दर हा सर्वात कमी मानला जातो. बँका ग्राहकांना एवढे स्वस्त कर्ज उपलब्ध करून देत आहेत, त्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, बँकांमध्ये लागलेली आपसातील स्पर्धा हे आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांनी सध्या स्वस्त लोनचा पर्याय निवडला आहे. पूर्वी होम लोन घेणारे ग्राहक होम लोनसाठी बँकांपेक्षा पतसंस्थांना अधिक प्राधाण्य द्यायचे. परंतु आता कल बदलला असून, ग्राहक होम लोनसाठी बँकांची निवड करत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) आपला रेपोरेट चार टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. ज्याचा फायदा बँकांना होत आहे.
कोणत्या बँकेत मिळेल स्वस्त होम लोन?
स्वस्त होम लोनबाबत बोलायचे झाल्यास सध्या 17 बँका अशा आहेत की, ज्या आपल्या ग्राहकांना 7 टक्के वार्षिक दराने होम लोनची सुविधा पुरवत आहेत. जर तुम्हालाही घर खरेदी करायचे असेल तुमच्यासाठी ही एक निश्चितच चांगली संधी ठरू शकते. तुम्हाला अवघ्या सात टक्के दराने कर्जाचा पुवठा होऊ शकतो. या बँकांमध्ये पंजाब अँड, सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया यांच्यासह काही सरकारी बँकांचा देखील समावेश आहे. या बँका आपल्या ग्राहकांना अवघ्या 6.5 ते सात टक्के दराने घर खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
घरांच्या किमती वाढल्या
ग्राहकांना सध्या बँकांकडून स्वस्त होम लोन मिळत आहे. मात्र दुसरीकडे घराच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. घर खरेदीसाठी लागणारा कच्चा माल महागल्याने घराच्या किमती वाढल्या आहेत. सर्वच कच्च्या मालाच्या किमती जवळपास सात ते आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात घरे विकणे परवडत नसल्याचे बिल्डर लॉबीचे म्हणणे आहे. त्यामुळे घराच्या किमती देखील सात ते आठ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. ज्यांना घरे घ्यायचे आहेत अशा लोकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.