घर खरेदीसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज केल्यास आवास योजनेतून मिळणार अडीच लाख रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर देशात सर्वांना घर हा उद्देश ठेवत पंतप्रधान आवास योजना राबवण्यास सुरुवात केली.
याअंतर्गत पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या नागरिकांनी गृहकर्जासाठी (Home Loan) 2 लाख 67 हजार रुपयांची सबसिडी (Subsidy) दिली जाते. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून येत्या काळात योजनेचा लाभार्थी बनण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठीच ही बातमी आहे. या योजनेची मुदत येत्या 31 मार्च 2022 रोजी संपत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घर खरेदी करण्याचा आणि होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर निर्णय तुम्हाला काही दिवसातच घ्यावा लागेल.
कशी आहे नेमकी योजना?
ज्या ग्राहकाला पहिल्यांदा स्वतःच्या नावाने घर खरेदी करायचे असेल, तसेच गृहकर्ज आणि रजिस्ट्रीत स्वतःच्या पत्नीचे नाव लावायचे असेल अशांसाठीच ही अडीच लाखांची सबसिडी मिळते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख ते 18 लाख रुपयांदरम्यान आहे, अशा गृहकर्जधारकांना योजनेचा लाभ मिळू शकतो. ज्यांचे उत्पन्न 6 लाखांपर्यंत आहे, त्यांना 6 लाखांच्या कर्जावर 6.5 टक्के सबसीडी, 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 9 लाखांच्या कर्जावर 4 टक्के सबसीडी तर 18 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांना 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्के सबसीडी मिळते.
31 मार्चपुर्वी फाईल अपलोड होणे आवश्यक
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसीडीचा लाभ घेण्यासाठी अंतिम मुदत 31मार्च 2022 अशी ठेवलेली आहे. या योजनेअंतर्गत पहिले घर खरेदी करताना गृहकर्ज घेतल्यावर बँका ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांचा अर्ज भरून घेतात. योजनेच्या सबसिडीसाठीचा अर्ज पोर्टलवर अपलोड करावा लागतो. त्यानंतर 5 व्या टप्प्यात सबसिडी गृहकर्ज खात्यात जमा होते. योजनेची मुदत 31 मार्च असली तरीही काही बँका 15 मार्च, 22 मार्चपर्यंतच ग्राहकांना मुदत देत आहेत. त्याच्या आत जर तुमचा अर्ज पोर्टलवर अपलोड झाला तरच सबसिडी मिळेल, असे सांगितले जात आहे.