दोन दिवसांत शेतकर्‍यांच्या कापसाचे माप सुरू होणार – जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे व माजी सभापती अरूण डाके जिल्हाधिकार्‍यांना भेटले


बीड दि.19 (प्रतिनिधी)ः- बीड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा कापूस दोन दिवसांत खरेदी करण्यास सुरवात करावी अन्यथा आपण अमर उपोषणास बसू असे निवेदन बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे व माजी सभापती अरूण डाके यांनी जिल्हाधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून दिले. यावेळी आपण उपोषणास बसू नये असे सांगून दोन दिवसांत 20 ग्रेडरच्या मार्फत 20 सेंटर चालू होतील व शासनाने माप चालू होईल असे आश्‍वासन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहे.


माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, उपसभापती गणपत डोईफोडे, माजी सभापती अरूण डाके व संचालकांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवार दि.19 रोजी निवेदन दिले. यामध्ये बाजार समितीत नोंदणी झालेल्या सर्व कापसाच्या वाहनांचे मोजमाप सुरू करावे. बीड तालुक्यातील 8 कापूस जिनिंगवर शासकिय कापूस खरेदीसाठी मान्यता देऊन सी.सी.आय.च्या सेंटरवरून 80 वाहनांची मापे सुरू करावी. प्रत्येक जिनिंगवर कमीत कमी 50 पासून 80 कापसाची वाहने मापासाठी घ्यावीत. कापूस जिनिंगवर चालू असलेल्या ग्रेडरच्या मनमानी कारभाराची दखल घ्यावी. शेतकर्‍यांना होणारा त्रास व खर्च या संबंधी तात्काळ कार्यवाही करावी. जिनिंगवर दररोज, सुट्टी न घेता कापसाचे माप करून पावसाळयापुर्वी सर्व शेतकर्‍यांचा कापूस खरेदी करावा तसेच कुठलेही कारण दाखवून शेतकर्‍यांच्या कापसाला नकार देऊ नये. शेतकर्‍यांच्या शेतात पिकलेला व उच्च प्रतिचा कापूस शासनाकडून घेतला जातो परंतू नैसर्गिक कारणामुळे खराब, डागलेला व कवडीपासून वेगळा असलेला कापूस कमी दराने का होईना तो खरेदी करण्यात यावा. खाजगी खरेदी दाराकडून शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या होत्या. दोन दिवसांत कापसाची मापे न झाल्यास आपण अमरण उपोषणास बसू असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तात्काळ दखल घेऊन दोन दिवसांत 20 ग्रेडरच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा कापूस खरेदी सुरू केला जाईल असे आश्‍वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!