देशनवी दिल्ली

महत्वाची बातमी:देशातील सर्व राज्यात 2 जानेवारीपासून लसीकरणाची रंगीत तालीम

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. अशात नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्रायरन म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ही माहिती दिली आहे. डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने आत्तापर्यंत ८३ कोटी सीरिंज खरेदी केल्या आहेत. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लसीकरणाचा ड्राय रन पार पडणार आहे. २ जानेवारीला लसीकरणाची रंगीत तालिम केली जाणार आहे असंही सोमानी यांनी सांगितलं. देशातील सर्व राज्यांमध्ये हा ड्राय रन पार पडणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

२०२० या वर्षाच्या सुरुवातीला करोनाचा शिरकाव भारतात झाला.

मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला. करोना सारख्या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्याचं कामही सुरु झालं. आता २०२१ च्या स्वागताची तयारी अवघा देश करत असताना मोदी सरकारने नव्या वर्षात लसीकरणाचा ड्राय रन राबवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातल्या सर्व राज्यांमध्ये २ जानेवारीला हा ड्राय रन पार पडणार आहे.

पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये आत्तापर्यंत ड्राय रन पार पडला आहे. त्याचे चांगले परिणामही समोर आले आहेत. ज्यानंतर आता केंद्र सरकारने २ जानेवारी रोजी सर्व राज्यांमध्ये करोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे.