ऑनलाइन वृत्तसेवा

अयोध्येतील श्रीरामचंद्र प्रभूचे भव्य मंदिर साडेतीन वर्षात पूर्ण होणार-गोविंददेव गिरी महाराज

अयोध्येतील श्रीरामचंद्र प्रभूचे भव्य मंदिर साडेतीन वर्षात पूर्ण होणार असून मुख्य मंदिरावर 300 ते 400 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान भव्य राममंदिराकरिता निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. 10 रुपयापासून 100-1000 रुपयांपर्यंत राशी देणगीच्या रूपात कूपनच्या माध्यमातून संग्रहित करण्यात येणार आहे. संपूर्ण मंदिरावर 1100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मंदिराचा पायवा दगडाने रचण्यात येणार असून बांधकाम तीन स्तरावर होणार आहे. या मंदिराकरिता राज्यस्थान येथील बन्सीपहाड येथून दगड मागविण्यात आले आहे.

मंदिर निर्माणाकरिता यापूर्वी जो निधी गोळा करण्यात आला होता त्यापैकी सहा कोटी रुपये न्यासाकडे जमा करण्यात आल्याची माहिती गोविंदगिरी महाराज यांनी दिली.

जमा करण्यात आलेल्या विटांचा वापर मंदिरात करण्यात येणार नसून त्याचा अन्य ठिकाणी वापर करण्यात येईल. मंदिर परिसर क्षेत्रात भव्य डिजिटल ग्रंथालय सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान 4 लाख गावांपर्यंत व 23 कोटी लोकांपर्यंत हे अभियान पोहचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले