करोना लसीकरण ऐच्छिक:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची महत्वाची माहिती

नवी दिल्ली – भारतात उपलब्ध होणारी करोनावरील लस इतर देशांमध्ये विकसित झालेल्या लसींप्रमाणेच प्रभावी असेल. तसेच, करोना लसीकरण ऐच्छिक असेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

करोना संकटावर मात करण्यासाठी पुढील काही काळात अनेक लसी उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, लसीबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्‍न घोंघावत आहेत. त्यातून जनतेला पडलेले प्रश्‍न आणि त्यांच्या उत्तरांची यादी आरोग्य मंत्रालयाने जारी केली. त्यातून लसीकरण अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्याचवेळी स्वत:ला आणि निकटवर्तीयांना करोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 28 दिवसांच्या अंतरात लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. दुसरा डोस घेतल्यानंतर आरोग्याचे रक्षण करणाऱ्या अँडीबॉडीज साधारणपणे दोन आठवड्यांनी विकसित होतात, असे नमूद करण्यात आले आहे.

विविध लसींच्या चाचण्या विविध टप्प्यांवर पोहचल्या आहेत. लवकरात लवकर लस उपलब्ध होईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. लसीची सुरक्षितता सिद्ध झाल्यानंतरच ती उपलब्ध केली जाईल. कर्करोग, मधुमेह, रक्तदाबासाठी औषधे घेणारेही करोना लस घेऊ शकतात, अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

आरोग्य सेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश असणाऱ्या प्राधान्य गटांना सर्वप्रथम लसीचा लाभ मिळेल. त्याशिवाय, 50 वर्षांवरील व्यक्तींचाही लसीकरणासाठी विचार केला जाईल. लसीसाठी पात्र ठरणाऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून लसीकरण केंद्राची आणि वेळेची माहिती दिली जाईल.

लसीकरण नोंदणीसाठी पुढीलपैकी काहीही चालणार…
वाहन परवाना, मनरेगा जॉब कार्ड, पॅन कार्ड, बॅंक/पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, पेन्शन कागदपत्र, सरकारी कर्मचारी ओळखपत्र, मतदार ओळखपत्र


error: Content is protected !!