दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस:मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता

मुंबई : ऐन थंडीच्या मोसमात पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं सध्या ढगाळ हवामान दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये गुरुवार आणि शुक्रवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं.
हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसात निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

गेले दोन दिवस कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुढील दोन दिवस कोकणातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभावमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.


error: Content is protected !!