ऑनलाइन वृत्तसेवापुणे

पुण्यातील सीरमकडून लस वापरास परवानगीसाठी अर्ज:निर्णयाकडे लक्ष

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.

‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.

दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लशसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.
अधिकृत सूत्रांनुसार, सीरमने आपल्या अर्जात म्हटलं आहे की, चार वैद्यकीय चाचण्यांचा डेटा कंपनीकडून एकत्रित करण्यात आला आहे. यामध्ये युकेमधील दोन, ब्राझील, भारतातील चाचण्यांचा समावेश आहे. याआधारे कोविशिल्ड करोनाविरोधात अतिशय प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.