देशनवी दिल्ली

आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे बंधनकारक:शेवटची मुदत जाहीर

मुंबई, 11 नोव्हेंबर: आधार कार्ड (Aadhar Card) आणि बँक खाते लिंक करणे अत्यावश्यक आहे. बँकेतील विविध व्यवहार करताना जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर समस्या उद्बवू शकतात. ‘समाजातील बरेच जण अजून मुख्य आर्थिक प्रवाहापासून दूर आहेत त्यामुळे बँक खाती काढून त्यांना प्रवाहात आणण्याचं काम अजून संपलेलं नाही. ते काम बँकांनी सुरूच ठेवावं तसंच जी बँक खाती अद्याप आधार क्रमांकांशी जोडलेली नाहीत ती 31 मार्च 2021 पूर्वी जोडून घ्यावी,’ अशा सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी दिल्या आहेत. भारतीय बँकांची संघटना इंडियन बँक्स असोसिएशनच्या (Indian Banks’ Association IBA) 73 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.
निर्मला सीतारामन यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ज्या खात्यांसाठी पॅन क्रमांकाची गरज आहे ती पॅनशी जोडणं आणि इतर सर्व खाती आधार क्रमांकाशी जोडणं ही कामं सर्व बँकांनी 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करा. बँकांनी डिजिटल पेमेंट वापरण्याच्या पद्धतींचा पुरस्कार करून यूपीआयशी जोडलेल्या आर्थिक व्यवहारांच्या पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. विनाडिजिटल व्यवहार करण्यापासून ग्राहकांना परावृत्त करण्याचं कामही बँकांनी केलं पाहिजे.’
बँकांचे सर्व व्यवहार युपीआयच्या (UPI) माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. बँकांनी रूपे (RuPay) कार्डांचा प्रसारही करायला हवा. ज्या कोणाला कार्ड वापरायचं असेल त्याला तुम्ही केवळ रूपे कार्ड घेण्याची विनंती करायला हवी. देशवासियांना मोठ्या बँकांच्या सेवांची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या.