महाराष्ट्राच्या हिताचे ते करणार म्हणजे करणारच-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी जगभर, देशभर, राज्यभर संकट आलं असताना महाराष्ट्राच्या बदनामीच जे कारस्थान केलं होतं ते मोडून तोडून आपण हजारो कोटींचे सामंजस्य करार केले, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं. देश-विदेशातील अनेक कंपन्यांना जागा दिल्या आहेत. 35000 करोड चे करार सही केले आहेत. घरात बसून सुद्धा मी हे काम केलं आहे. जे मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या हिताचे ते करणार म्हणजे करणारचं! आम्हीं काही डोळे मिटुन कारभार करत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. चहु बाजुंनी संकट येत असली तरी संकटाचा सामना करून आपण त्यांना पुरून उरत आहोत, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, हळू हळू सर्व बाबी उघडत आहोत. सिनेमागृहे, नाट्यगृहे, जिम, व्यायामशाळा, उद्योगधंदे. हळू हळू सर्वच गोष्टी सुरू करत चाललो आहोत. पुन्हा पुन्हा हे म्हणणं आहे, ही आरोग्याची लढाई आहे. हे सरकार तुमचं आहे, तुम्हीच आहात सरकारचे मालक – पालक. तुम्हाला न्याय देणार नाही तर काय करणार? माझ्या राज्यातील जनता समाधानी नसेल तर मंत्रिमंडळ काय करणार. आपण यशस्वीपणे ठामपणे पुढे जात आहोत, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, मास्क घातला नाही तर दंड करावाच लागणार. एक कोरोना रुग्ण गर्दीत फिरला मास्क न लावता तर 400 लोकांना संक्रमित करू शकतो. ते पुढे किती करतील, याचा विचार करा. हे मी डॉक्टरांशी, तज्ज्ञांशी बोलुन सांगत आहे. त्यामुळे मास्क अनिवार्यच आहे. 60000 लोकांनी अहोरात्र, स्वत:च्या जीवाची मेहनत केलीत. त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवली, म्हणून कोरोना नियंत्रणात आला. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. कोरोना योद्ध्यांना सलाम!, असं ते म्हणाले.
मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे 4 दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे, असं ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले की, मंदिर उघडणारच आहोत… परंतु त्यासाठी नियमवली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असं ठाकरे म्हणाले.

दुसरी लाट ही लाट नाही त्सुनामी

ते म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू आला होता. त्याही वेळेला काही कोटी बळी गेले होते. असं म्हणतात आपल्या देशात 1 कोटींच्या आसपास लोक बळी गेले होते. तेंव्हाची लोकसंख्या काय होती? मी घाबरवत नाही परंतु सतर्कतेची आवश्यकता आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, अनेक ठिकाणी आकडा शून्यावर येऊन पाश्चिमात्य देशात परत वाढला. इटली, इंग्लंड, स्पेन अनेक देश पहा. काही ठिकाणी तर घरातही मास्क घालणे बंधनकारक आहे. परत लॉकडाऊन केला आहे. दुसरी लाट ही लाट नाही त्सुनामी आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले.


error: Content is protected !!