महाराष्ट्रमुंबई

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार:खा राऊत यांचे संकेत

मुंबई-शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच दसरा मेळावा असेल. शिवाय दसरा मेळाव्याचे महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्यादेखील आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत चर्चा होईल आणि नियम तसेच आरोग्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीचे नियोजन केले जाईल, असे सांगताना दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार’, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी स्पष्ट केले.
येत्या २५ ऑक्टोबरला दसरा असून त्यानिमित्ताने होणारा शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ऑनलाइन होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याचे राऊत यांनी खंडन केले. ‘कुणी सांगितले शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल? उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचे भाषण हे व्यासपीठावरूनच होईल. त्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे’, असे सांगत राऊत यांनी सेनेचा यंदाचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचे संकेत दिले.
दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून येत्या एक-दोन दिवसांत त्यावर निर्णय होईल. यंदा प्रथमच ठाकरे मुख्यमंत्री आहेत. बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून दसरा मेळाव्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे राऊत यांनी सांगितले.