महाराष्ट्रमुंबई

राज्यातील शाळेच्या घंटाआता दिवाळीनंतरच वाजणार:मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने संपूर्ण देशभरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. त्यानंतर अनलॉक होण्यास सुरूवात झाल्याने सर्व व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, शाळा, महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबर नंतर शाळा सुरू करण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्याची मोकळीक राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. पण महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू होणार की नाही? असा प्रश्न सर्वांच्या मनात होता.
या संदर्भात आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाला निर्णय?

राज्यातील शाळा वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले.

निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांना

केंद्रीय गृहमंत्रालयाने ३० सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, शाळा पुन्हा सुरू करण्याबाबतचे निर्णय घेण्याची मोकळीक सर्व राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरनंतर राज्य सरकार टप्प्याटप्प्याने आणि संबंधित शाळा, शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनासोबत चर्चा करुन तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा, खाजगी शिकवणी वर्ग सुरू करण्याबाबतचे निर्णय घेऊ शकतात. पण महाराष्ट्रातील कोविड-१९ ची असलेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळा तुर्तास सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संदर्भातील निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येईल असंही म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा ५वा टप्पा

महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेनचा नवा टप्पा सुरू झाला आहे. यानुसार राज्टातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंट, हॉटेल्सस फूड कोर्ट्स, आणि बार हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने संमती दिली आहे. या संदर्भात राज्याच्या पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.