विदेशवृत्तसेवा

Good News ! रशियात कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी यशस्वी

मॉस्को : कोरोनामुळे एकीकडे जग हतबल झाले असताना रशियातुन एक जगासाठी चांगली बातमी समोर आली आहे. रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. सर्व चाचण्या पूर्ण करणारी ही जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असणार आहे. सेशेनोव्ह विद्यापीठ रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती सेशेनोव्ह विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलॅशनल मेडिसीन आणि बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव्ह यांनी रशियातील अधिकृत वृत्तसंस्था स्पुटनिकला दिली आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी नोंदणी केलेल्या स्वयंसेवकांच्या पहिल्या तुकडीला बुधवारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले तर दुसऱ्या तुकडीला येत्या 20 जुलैला म्हणजे पुढील सोमवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

सेशेनोव्ह विद्यापीठात 18 जूनपासून या मानवी चाचण्यांना सुरुवात केली आहे. गामालेई संसर्गजन्य रोग आणि सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन संस्थेने ही लस बनवली आहे. कोरोना व्हायरस लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करणार सेशेनोव्ह विद्यापीठ हे जगातले पहिले विद्यापीठ असल्याने रशियाने तयार केलेली लस ही पहिली असल्याचा दावाही वादिम तारासोव्ह यांनी केला आहे. या विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटॉलॉजी आणि ट्रॉपिकल तसेच व्हेक्टर बॉर्न डिसीजचे संचालक अलेक्झांडर लुकाशेव यांनीही या लसीच्या मानवी चाचण्या यशस्वीपणे पूर्ण झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. ही लस दिलेल्या मानवी स्वयंसेवकावर कसलाही विपरित परिणाम झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. ही लस मानवी वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

जगभरात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीवर 140 ठिकाणी संशोधन सुरु आहे, त्यापैकी तब्बल 11 संशोधनांना मानवी चाचण्यांची परवानगी आहे. रशियाच्या सेशेनोव्ह विद्यापीठात सुरु असलेल्या मानवी चाचण्या या चाचण्यांपैकीच एक होत्या. जगभरात ज्या कोरोना प्रतिबंधक लस मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत, त्यात भारताच्याही दोन लसींचा समावेश आहे. हैदराबाद येथे मुख्यालय असलेली भारत बायोटेक (Bharat Biotech International Limited) आणि कॅडिला हेल्थ केअरच्या (Cadila Healthcare) झायडस कॅडिला (Zydus) यांनी भारतात लसींच्या मानवी चाचण्या सुरु केल्या आहेत.
भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) तर झायडस कॅडिलाच्या लसीचे नाव झायकोव-डी (ZyCov-D) असे आहे. या दोन लसींशिवाय मानवी चाचण्यांच्या टप्प्यात असलेल्या जगातील अन्य 11 लसींना मास प्रॉडक्शन म्हणजे मोठ्या प्रमाणावरील व्यावसायिक उत्पादनासाठी भारताचीच मदत घ्यावी लागेल, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने गेल्या आठवड्यात सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *